हरवलेल्या संधींचा आक्रोश...
हरवलेल्या संधींचा आक्रोश... देशभरात नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीवर संताप उसळला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी खेळ करणाऱ्या या प्रकाराविरोधात रस्त्यावर आंदोलन होत आहेत. सामाजिक माध्यमांवर निषेध व्यक्त होत आहे. संसदेत चर्चा होत आहे. न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जात आहेत. परंतु या गोंगाटात एक आवाज मात्र अजूनही ऐकू येत नाही. तो आवाज आहे त्या विद्यार्थ्यांचा, जे पेपरफुटीमुळे नाही, तर संधीच न मिळाल्यामुळे डॉक्टर, अभियंते किंवा संशोधक होण्याचे स्वप्न गमावून बसतात. जे नीटच्या प्रश्नपत्रिकेपर्यंत पोहोचतच नाहीत... कारण त्यांच्या आयुष्यातील खरी परीक्षा प्रश्नपत्रिकेने नव्हे, तर गरिबीने घेतलेली असते. एका बाजूला कोट्यवधी रुपयांची कोचिंग इंडस्ट्री आहे. वातानुकूलित वर्गखोल्या, वैयक्तिक मार्गदर्शन आणि वर्षानुवर्षे चालणारी तयारी आहे. दुसऱ्या बाजूला गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे. बारावीनंतर पुढे शिकायचे की घर चालवण्यासाठी काम करायचे, हा प्रश्न रोज समोर उभा असतो. या दोघांना एकाच दिवशी एकच प्रश्नपत्रिका देऊन आपण म्हणतो—"आता सिद्ध करा, कोण अधिक गुणवंत आहे." ही स्पर्...