मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

#तरुण_भारत_संपादकीय
#संकटराव_आणि_संपतराव
★★★★★★★★★★★★★★★★★
http://www.tarunbharat.com/news/609590

सांगली जिल्हय़ातील पाणी चळवळीचे एक जुने जाणते नेते संपतराव पवार यांच्या ‘मी लोकांचा सांगाती’ या आत्मवृत्ताचे प्रकाशन रविवारी झाले. संपतरावांनी जिद्दीने साकारलेल्या देशातील क्रांतिकारकांच्या एकमेव स्मृतीवनात, बलवडी ता. खानापूर येथे ते पार पडले. दुष्काळ, नापिकी, पाण्याची कमतरता, वाहून जाणाऱया पाण्याचा प्रश्न अशा समस्यांवर शाश्वत उपायाची उदाहरणे समाजासमोर ठेवणारे संपतराव प्रथमच पुस्तकाच्या रूपाने व्यक्त झाले. श्रावणसरींच्या साक्षीने हा समारंभ होत असताना वैचारिक श्रावणाचाही हा मोसम असल्याचे जाणवत होते. या काळात सर्वत्र चर्चा होती ती साधकांच्या घरात दहशतवादविरोधी पथकाला सापडलेल्या बॉम्बची आणि त्या साखळीतच एका पाठोपाठ एक एक हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते सापडत असल्याची. विशिष्ट घडामोडींमुळे देशासमोर संकट उभे आहे असे सतत सांगत युवकांना भरकटवणारे संकटराव एकीकडे आणि शाश्वत विकासाच्या पर्यायांची मालिका उभी करून युवकांना विकासकार्यात गुंतविणारे आणि या मार्गाने चला असा अबोल संदेश देणारे संपतराव दुसरीकडे अशा रितीनेच या घटनांकडे पहावे लागेल. अर्थात संपतरावांचे कार्य फार प्रसार पावलेले नाही. त्या त्या भागात त्याचा बोलबाला असला तरी  इतके मोठे कार्य जगाच्या नजरेत भरेल असे पुढे आलेले नाही. हे कष्टप्रद कार्य आहे. त्यासाठी मान, अपमान स्वीकारावे लागतात, खांद्याला झोळी बांधावी लागते आणि आपल्या कार्याचे श्रेय हे तुमचेच आहे, तुम्ही लोक एकत्र आला म्हणून हे घडू शकले असे सांगून लोकसहभाग वाढवत फिरावे लागते. प्रसंगी स्वतःला मातीत गाडून घ्यावे लागते, काळाच्या आगीत तावून, सुलाखून आणि पुरते करपून बाहेर यावे लागते. जखमी मनावर नव्या उमेदीचे, नव्या उद्दीष्टांचे मलम फासून पुन्हा चालत रहावे लागते. संतपराव होण्यासाठी हे करावे लागते. संकटराव होण्यासाठी तसे नसते. परिस्थिती येईल तसे भडक, विध्वंसक आणि ध्रुवीकरणाचे बोल बोलत राहिले की हिरवा, भगवा, लाल दहशतवादी मिळवता येतो. अर्थात रंग हेही ध्रुवीकरणच. तो फक्त दुसऱयाला शत्रू म्हणून उभा करतो. परिणाम महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा अशा शांत, संयमी परिसरातील काही घराघरात दिसू लागला आहे. पूर्वी पंजाब, आसाम, बंगाल, काश्मिरची चिंता वाहिली जायची. आता इथली सुशिक्षितांची मुले बाँब बनवल्याच्या आरोपाखाली अटकेत जात आहेत. काही स्फोटात मेली आहेत. काहींवर विचारवंतांच्या खुनाचे दोषारोपपत्र दाखल झालेले आहे. आभासी संकटांनी आपले जीवन असे व्यापण्यास सुरुवात झाली आहे. 1970 च्या दशकात आलेल्या दुष्काळांमुळे महाराष्ट्रात अनेक प्रयोग झाले. त्यातीलच बळीराजा धरण हा समान पाणी वाटपाचा एक प्रयोग होता. शेकापक्षाचे कार्यकर्ते असलेले संपतराव पवार या धरणाच्या कामातून समाजापुढे आले. दुष्काळाचे आव्हान पेलण्यासाठी सुकाळी आणि कमी पावसाच्या भागात शाळकरी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून वैरण उत्पादन, दुष्काळी शेतकऱयांची जनावरे सुकाळी शेतकऱयांना संकटकाळापुरती दत्तक देऊन जगवणे, मैत्र जिवा चारा अशा प्रयोगांनी संपतरावांनी सरकारवर अवलंबून न राहता, लोकांनी स्वतःच स्वतःच्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचे यशस्वी पर्याय पुढे ठेवले. उपसा जलसिंचनच्या कोटय़वधीच्या खर्चाला आणि अवैज्ञानिक सरकारी उपक्रमांना पर्याय म्हणून त्यांनी दुष्काळी भागात बंधाऱयांची माळ लावली. कालौघात लुप्त झालेल्या अग्रणी नदीवर काठाच्याच दुष्काळी शेतकऱयांना राबायला लावून सरकारी खर्चाच्या तरतुदीच्या निम्म्याहून निम्म्या इतक्या कमी स्वखर्चात जनतेने उभारलेल्या या बंधाऱयांनी शेतीच्या पाण्याचा प्रश्न तर संपलाच पण, लुप्त झालेली अग्रणी नदी जिवंत केली. शिराळय़ात कोकणासारखा पडणारा पाऊस वाहून जातो. तिळगंगा नदीवर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पेठ गावात भंगार टायरपासून बंधारा बांधून ती नदीही जिवंत केली. हे सारे प्रयोग खरेतर शासनाने स्वीकारले पाहिजेत आणि त्याची राज्यातील विविध विभागाच्या गरजेनुसार धोरण म्हणून अंमलबजावणी झाली पाहिजे. पण, कमी खर्चात आणि लोकसहभाग असल्याने आजच्या टेंडरधार्जिण्या काळात ते उचलून कोण धरणार? त्यामुळे जलयुक्त शिवारातही या प्रयोगांना पुरेसे स्थान मिळणे मुश्किलच. साधा उल्लेखही टाळला जातो. संपतराव स्वतः डाव्या विचाराचे पण आपल्या कार्यात त्यांनी संघाच्या कार्यकर्त्यांनाही सामावून घेतले. त्यांच्या कार्याचे कौतुक त्यांच्या शेतकरी कामगार पक्षालाही नाही. काँग्रेस, भाजप या सरकारी पक्षांना तर नाहीच नाही. पण, शिवाजी विद्यापीठात शिकणाऱया राष्ट्रीय सेवा योजनेच्या मुला, मुलींसह ते टिकाव, फावडे घेऊन उतरतात. दुष्काळी हिवतडसारख्या कुठूनच पाणी मिळणार नाही अशा गावात फक्त 22 हजार लीटर पाण्याच्या साठय़ावर वर्षभर डाळींब बाग जगवण्याचा प्रयोग यशस्वी करतात. पंधरा हजारात वर्षभर राबणाऱया रामोशी कुटुंबांना स्वतःच्या शेतीत बागायतदार बनवतात. लोकांना सरकारकडे मागतकरी बनविणारी व्यवस्था पोसण्यापेक्षा लोकांनीच पर्याय शोधून ती प्रत्यक्षात उतरवावीत आणि त्यामध्ये सुशिक्षित वर्गाने बुद्धी, अर्थ आणि शक्तीरूपाने योगदान द्यावे, निर्बलांच्या पाठीशी शक्ती उभी करून त्यांना स्वतः सबल व्हायला लावावे या विचाराने ते झटत आहेत. मराठा मोर्चा उद्या जेव्हा आरक्षण मिळेल तेव्हा भरकटेल. नामांतरानंतर अनुसूचित जाती आणि आरक्षणानंतर ओबीसी भरकटले. हा इतिहास आहे. पुढे काय करायचे त्याचा कार्यक्रम हवा. त्यांनीही संपतरावांचा हा शाश्वत मार्ग अंगीकारला पाहिजे. दगड फेकत फिरण्यापेक्षा दगडाचे बंधारे बांधून शेती सुधारण्यासाठी  तरुणांना तयार करावे लागेल. विचारसरणी कोणतीही असो आपण संकटराव बनणार की संपतराव हे ठरवण्याची वेळ आली आहे!