शनिवार, २१ जुलै, २०१८

आग्रहाचे अवाहन.....

स्वातंत्र्य चळवळीतील ध्येयवाद,राष्ट्र उभारणीच्या प्रखर प्रेरणेची किनार माझ्या आयुष्याला बालपणापासून मिळत गेली.शालेय जीवनात पुरोगामी विध्यार्थी संघटना आणि शे.का.पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जन चळवळीत सक्रीय राहिलो.१९७२ साली विधानसभेची निवडणूक लढवण्याची जबाबदारी अंगावर आली.या निवडणुकीला विध्यार्थी-युवकांनी उठावाचे स्वरूप आणले.मोठ्या विश्वासाने साथ दिली.तो विश्वास सार्थ ठरावा म्हणून प्रत्येक अडचणीत त्यांच्याबरोबर राहिलो.काही प्रश्न निर्णायक लढवले.काही प्रश्नाबाबत धोरण स्वीकारावे लागले.पन्नास वर्षाहून अधिक काळ सातत्याने झुंजत राहिलो मात्र १९७७ नंतर डावी पुरोगामी,परिवर्तनवादी चळवळ क्षीण क्षीण होत गेली.त्याची कारणे शोधण्याची गरज जाणवू लागली.चळवळ हे माझे एकट्याचे काम नाही.जे काही घडत गेले त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील किमान शंभर हून अधिक शे.का.पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उल्लेखनीय सहभाग होता.चळवळीतील खरीखुरी शक्ती तीच होती.या चळवळीचा वृतांत लोकांपुढे सादर करावा.काय चुकलं ते शोधावं.या उद्धेशाने हा प्रवास प्रकाशित करत आहे.

पुस्तकाचे प्रकाशन करताना आज चळवळीतील सर्वांची आठवण येते.त्यांचे चेहरे नजरेसमोर येतात.त्या सर्वांचा उल्लेख करणे शक्य झाले नाही.या प्रवासात एखाद्या पक्षाशी,विचारशी एकनिष्ठ राहून उभे आयुष्य पणाला लावणारी,अखेरच्या श्वासापर्यंत विचार जोपासनारी,तत्वनिष्ठ त्यागी माणसांचा मला सहवास लाभला.तीच माझी प्रेरणा होती.अशा त्यागी,निष्ठावान कालवश नेत्यांचे,कार्यकर्त्यांचे कर्तुत्व विस्मृतीत जावू नये म्हणून त्यांचे सामुहिक स्मारक निर्मिती चा शुभारंभ याप्रसंगी मा.आमदार भाई धैर्यशील पाटील,पेण याच्या हस्ते क्रांतीस्मृतीवनात करण्यात येत आहे.

दुष्काळ निवारण व निर्मुलणासाठी योजलेल्या सर्व उपक्रमास शिवाजी विद्यापिठाची भक्कम साथ लाभली.डॉ.के.बी.पवार,डॉ.माणिकराव साळुंखे,डॉ.एन.जे.पवार,डॉ.देवानंद शिंदे या सर्व कुलगुरुनी एन.एन.एस.ची ताकद दिली.एन.एन.एस.विभागप्रमुख डॉ.डी.के.गायकवाड सरांच्या उत्साही प्रतिसादामुळे कोरडवाहू शेतीत मर्यादित पाण्याच्या सूत्रबद्ध नियोजनातून पर्यावरण पूरक पिकपद्धतीचा प्रसार करण्याचा प्रयत्न सुरु आहे.या सहकार्याबद्दल ‘शिवाजी विध्यापिठाचा सन्मान’ मा.मेधा पाटकर यांच्या हस्ते या निमित्ताने करीत आहोत.

तसेच मी अनेकदा जीवघेण्या आपत्तीत सापडलो.जगणे आणि टिकून राहणे शक्य न्हवते अशा अत्यंत कठीण समयी अनेकांनी निरपेक्षपणे आधार दिला.म्हणून मी तरलो.त्यापैकी प्रातिनिधिक अशा ....
कालवश मा. पी एम औताडे (सर)/शशिकांत औताडे,पुणे  सन १९६०
कालवश भाई डी.बी.जाधव/शरद जाधव,दुधोंडी –सन १९८३-८४
मा.डॉ.राजेंद्र भागवत,निरामय हॉस्पिटल सांगली - सन २०००
कालवश मारुतीराव निगडे/विजय निगडे,कोल्हापूर - सन २०००
मा.कुमार भिडे,पुणे - सन २०००
महात्मा फुले पतसंस्था,नागराळे - सन २०००
मा.विजय परांजपे,पुणे - सन २००६
मा.प्रसन्न मराठे,पुणे - सन २००७
मा.राजेंद्र मदने,पुणे - सन २०१३
मा.नारायण देसाई,गारगोटी - सन २०१३
मा.मोहन देशमुख,मुंबई - सन २०१३
या मान्यवरांचा या प्रसंगी ऋणनिर्देश करण्यात येईल.

दि.१२ ऑगष्ट २०१८ रोजी क्रांतीस्मृतीवनात माझ्या आयुष्यातील मागील ७६ वर्षातील चळवळीचा वृतांत ‘मी लोकांचा सांगाती’ या पुस्तकरूपात प्रकाशित होत आहे.या कार्यक्रमात ‘भविष्यात पुरोगामी शक्ती वृद्धींगत कशी करता येईल?’याचे विचार मंथन होईल तरी आपण अगत्य उपस्थित रहावे हि नम्र विनंती
आ. भाई संपतराव पवार