बुधवार, २० डिसेंबर, २०१७

--////--पाणी रे पाणी तेरा रंग कैसा--////--



पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या आटपाडी तालुक्यात दोन वर्षांपूर्वी टेम्भूच पाणी आलं.पिढ्यान पिढ्या पिचलेल्या लोकांच्या आनंदाला आणि उत्साहाला त्यामुळे उधाण आलं.जगण्याच्या नव्या लढाईला तोंड फुटलं.शेकडो वर्षे भुकेनं पेटलेले लोक आधाशासारखी पाण्यावर तुटून पडली.जिवाच्या आकांतान पाण्याची पळवापळवी चालू झाली.या धामधुमीत हि लढाई दूर डोंगर उतारावरून केवळ पहात बसण्याशिवाय पर्याय नसलेल्या माणसाच्या डोळ्यातलं पाणी कुणाला दिसलच नाही.एका कर्मयोग्याच्या मनाला मात्र ते ढसल.पाणी उचलून नेण्याची ऐपत नाही.नशिबानं कॅनॉलजवळ शेती नाही.पाझरान आपसुख लाभ मिळायची शक्यता नाही.अशा हतबल,हताश लोकांना मग संपतराव दादांनी गोळा केलं.हात उगारण्यासाठी नसतात,हात मागण्यासाठी नसतात, हात निर्मितीसाठी असतात या मंत्राने त्यांच्यातला आशावाद चेतवला.आणि डोंगराच्या पायथ्याला या तिसऱ्या जगातही सुरु झाली एक अनोखी,अदभूत लढाई...


डोंगराच्या उताराला आता वर्दळ दिसु लागली.युद्धासाठी लागना-या सामानाची जुळवाजुळवी सुरु झाली होती.दादांनी दारोदारी हिंडून कुठंन कुठंन डाळिंबाची रोपे,पाईपा, पाण्याच्या टाक्या मिळवल्या.मागोमाग शिवाजी विद्यापीठ अवतरलं.सांगावा आल्यानंतर निघणं वेगळं आणि कुठूनतरी कळाल्याबरोबर धावणं वेगळं.शिवाजी विद्यापीठाच धावणं हे नेहमीच दुसऱ्या प्रकारातलं.सामाजिक संवेदनांची जपणूक त्याच भावनेतली.लढाईचा शंखनाद झाला.कधी चुलीपुढेे शेकायलाही न बसलेल्या कॉलेजच्या मुलींनी हातातला महागडा मोबाईल बाजूला ठेवून खुरप घेतलं.मुलांनी आपापल्या जातीचे कंडे मागं सारून हातात फावढं घेतलं.पुढं पंच्याहत्तर वर्षांचा तरुण यांना कामात लाजवत होता.पाचही कुटुंबांनी रात्रीचा दिवस केला.आणि अखेर हजारो वर्षे ऊन वादळवारा यांना न जुमाननारा निष्ठुर खडक या साऱ्यांच्या इच्छाशक्तीपुढे नतमस्तक झाला.


बाजूला पाण्यातल्या बेडकांचे डराव डराव आणि पाण्याच्या अभिषेकाच्या मंत्रांचा जयघोष दम खात न्हवता.आणि हाकेच्याच अंतरावर मात्र शांतपणे लाडक्या लेकराला पाणी पाजवं तसं डाळिंबाला पाणी भरवलं जात होतं.डोंगराच्या पायथ्याला आक्रीत घडत होतं.पाच पांडवांच्या कुटुंबासाठी आगळ वेगळं महाभारत घडत होतं.


त्या गावात गावात आता अंगात शिरलेल्या पाण्यानं परीट घडीची कपडे चढवली आहेत.डोळ्यांना रेबॅन गॉगल चढवून फटफटिंचे आवाज फिरत आहेत.आणि वरच्याच टेकाला दोन वर्षांच्या अविरत कष्टाला पाहिलं फळ आलं आहे.गाळलेल्या घामाच्या धारांनी कालवणातल्या तेलाचं रूप मिळवलं आहे.दर दिवाळीला गावातल्या पोरांच्या अंगावर नवी नवी घडूतं कुठंनं येतात ? आभाळात सोडलेले रंगीबेरंगी बाण कुठंनं येतात हे इथल्या मुलाबाळांना पडलेलं नेहमीच कोडं यंदा सुटलं आहे.


सध्या आमचा पंच्याहत्तर वर्षांचा तरुण वाड्यात आत बाहेर करताना सारखा गुरगुरत असतो.'आताशी एक किल्ला घेतलाय'असं काहीतरी सतत पुटपुटत असतो.म्हणून मी पुढच्या किल्ल्याला भिडायच ठरवलं.नवी हत्यारं घेऊन आपण पण या लढाईत घुसायच ठरवलं.मग दादांच्या जुन्या लढाईतल्या दोन सैनिकांना घेऊन परवा बाहेर पडलो.अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतलाच रामोशी वाटावा असा रामोशी समाजातला बलदंड रांगडा गडी धनाजी मंडले आणि कायम त्याचंच बरोबर असं वाटत राहणारा त्याचा मैतर हाणमा.मला कड्याकपारीत हिंडवत होते.जिथं लाईट,पाणी न्हवे साधा रास्ताही पोहचला नाही अशा ठिकाणी राहणाऱ्या माणसांना भेटवत होते.फिरता फिरता एक टेकाड चढून वर गेलो.समोर तुम्ही सुरवातीला चित्रात बघितलेलं घर दिसलं.धनाजींन बायडे...म्हणून हाळी दिली तशी जन्मात आरसा न बघितलेली एक सुंदर बायडी झाट्टदिशी बाहेर आली.


बायडी-आरं भावड्या,कशी वाट चुकलास.?


धनाजी-आलंतो असंच, बाबज्या कुठाय?


बायडी-चक्कीवं गेल्याती,येतील इतक्यात.या कीं आत म्हणत तीन घरात जाऊन झटकून तळवट टाकलं.काठ चेपक्या तांब्यातन पाणी पुढं ठेवलं.मी म्हणालो,पाव्हण्याला यायला उशीर लागलं तोवर मी जेवून घेतो.तशी बायडी चपापली.आता ह्यांना काय वाढायच हा तिच्या चेहऱ्यावरचा प्रश्न मला स्पष्ट दिसला.मी पिशवीतन पेपराची गुंडाळी बाहेर काढत म्हणालो मी घरातन जेवण बरोबर घेऊनच बाहेर पडतो.तशी ती शांत झाली.मी जेवायला सुरवात केली.ती वरून शांत दिसत असली तरी तिची चुळबुळ मला जाणवत होती.घरातली इन मिन दहा बारा भांडी ती उगीचच इकडुन तिकडे मांडायचं नाटक करत होती.मी हेरलं तिला मला काहीतरी द्यायचं होतं.पण काय..??कोप-यातल्या गाडग्याकड तिचा हात गेला.तेवढ्यात तिची चोरटी नजर माझ्या जेवणातल्या चटणीवर पडली.मग हताश होऊन गाडग्याकड गेलेल्या तिच्या हातानं गाडग नुसतंच हलवून सरळ बसवायचं नाटक केलं.नाईलाजानं येऊन कुडाकड तोंड करून बसली.पण तिची तगमग संपली न्हवती.एक माणूस आपल्या घरात जेवतोय आणि मी..?तिच्या पुढचा प्रश्न खरंच गंभीर होता.अचानक काहीतरी आठवल्यासारखं ती पुन्हा उठली.कुडात खुपसलेलं एक फडकं काढलं आणि त्यातला कांदा वाटीत घेऊन माझ्यापुढं ठेवला.मी तो उचलून बाजूच्या कागदावर ठेवला.बायडी चरकली.अवो खावा कि,चांगलाच हाय,आमच्या कमीन सकाळीच त्यातला अर्धा कापून खाल्लाय.!तिला आवडतो.खोटं बोलत होती ती.आठड्यापूर्वी कापलेल्या कांद्याला ती सकाळी कापलाय म्हणून खपवत होती.आता तो संपवावा कि कमीसाठी ठेवावा या कोड्यात मी पडलो.शेवटी वरची चार टरफले खाऊन मी तीच समाधान केलं आणि चार कमीसाठी ठेवून माझं.मी जेवत असताना धनाजी तिला महाभारत ऐकवत होता.दादा,भाऊ,विद्यापीठ,शाळा सगळी मदत करत्यात.आपण फकस्त कष्ट करायचं.चांगलं दिवस येतील.हे भरवत होता.पण बायडी सगळ्याला नगं नगं म्हणत होती.बराच वेळ वाट बघून हाणमा म्हणला हे बेनं घरात कवाच घावायच नाय चला गावात हाय का बगूया.निरोप घेताना बायडी मला म्हणाली,भावजी आमच्याकडं सगळं हाय.मी तर या जत्रची त्या जत्रलाच गावात जाती मग आमला कशाला काय लागलं...?तीच हे अजब तत्वज्ञान ऐकुन माझ्या डोक्यात वीज कडाडली.या झटक्यान त्या टेकडीवरून ढकलून दिल्यासारखं वाटलं.गडगडत आम्ही खाली आलो.

आता गावातल्या देवळात येऊन बसलो.पण माझं मन मात्र बायडीच्या छपरात रुतून बसलं होतं.संसारात उभी जळत असली तरीही भावानं दिलेलं हक्काचं लुगडं नाकारणारी बायडी माझ्या पुढंन उठत न्हवती.काही केल्या तिचा भग्न संसार माझ्या पुढंन हालत न्हवता....मी धनाजीला म्हंटल.धनाजी,आपण या लोकांचं दुःख,दारिद्रय किती कमी करू शकू हे माहिती नाही मला.पण डोंगरावर तडफडून मेलं तरी चालेल पण दुस-याची मदत आणि लाचारी झिडकरणारी माणसं जंगली पाहिजेत,त्यांचा स्वाभिमान जगला पाहिजे....!

घे,तुझ्या बायडीच नाव आपल्या यादीला..

तसं धनाजींन चमकून माझ्याकडं पाहिलं.

त्याक्षणी निधड्या छातीच्या धनाजीच्या डोळ्यातन खळकन गळलेलं पाणी मला....

धरणातन सोडलेल्या पाण्यागत दिसलं...........

संदेश पवार १४/१२/१६

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

महामहिम राज्यपाल श्रीनिवास पाटील,खासदार श्रीमंत शाहू महाराज ,ले.जनरल पंनू, ब्रिगेडियर प्रवीण पाटील,पुणे महानगरपालिका आयुक्त दळवी साहेब इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत आज कराड येथे भाई संपतराव पवार यांना 'जीवन यशवंत गौरव' पुरस्कराने सन्मानित करण्याचे आले.....
कारगिल विजय दिवस समारोह समितीचे लक्ष लक्ष आभार

बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

क्रांतिवीर नागनाथ अण्णा,मा.शरदचंद्रजी पवार आणि आता भाई संपतराव पवार...
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या 'जीवन गौरव यशवंत' पुरस्काराने भाई संपतराव पवार यांचा सन्मान
कारगिल विजय दिवस समारोह समिती(कराड)यांचे मनःपूर्वक आभार..
दि.15 डिसेंबर 2017
कृपावंत आम्ही......
अँड.संदेश पवार

उगम फौंडेशन, क्रांतिस्मृतिवंन,बलवडी

शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

प्रामाणीक कर्तृत्वाचा सन्मान

आमचे मार्गदर्शक कर्मयोगी बाबा आमटे टायर बंधारा,अग्रणी पुनरुज्जीवन प्रकल्पातील जेष्ठ सहकारी मा.विलास चौथाई याना बाळासाहेब गलगले पुरस्कार जाहीर.त्यांचे क्रांतीवन,उगम संस्था,संपतराव पवार,अँड.संदेश पवार,नितीन बारवडे यांच्यातर्फे हृदयपूर्वक अभिनंदन.

रविवार, २० ऑगस्ट, २०१७

तुम्ही सामना चित्रपट पाहिलाय.?
या चित्रपटात गावच्या राजकारणात मारुती कांबळे चा खून केला जातो.खून केलेला टग्या अख्ख्या गावाला माहिती असतो.पण त्याच्या दबावापुढे सारे हात टेकतात.
विवेकवाद्यांच्या खुनात तशीच काही अवस्था पोलिसांची झाली असावी...!
आणि आपण मात्र श्रीराम लागुसारखे वेड्याप्रमाणे मारुती कांबळे च्या खुनाचे काय झाले म्हणून ओरडणारे..
वेडे ठरवले जात आहोत......!!
--अँड संदेश पवार

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

Jalnayak

Mr sampatrao pawar was selected as national 'JALANAYK' at national water conservation for drought free India held at Vijayapura KARANATAKA 16,17,18 August2017
Adv sandesh pawar